जालना , दि.१ जून २०२०: बदनापुर तालुक्यातील सोमठाणा येथील एका २० वर्षीय विवाहित युवतीने विषारी औषध प्राशन करुन तर व वरुडी येथील एका २२ वर्षीय युवकाने वायरने गळफास घेतल्याची दुदैवी घटना रविवारी (दि.३१)रोजी उघडकीस आली आहे.
एकाच दिवशी या दोघांनी आत्महत्या केल्याने यांच्यात प्रेम संबंध असल्याची चर्चा सर्वत्र होती.परंतू पोलिसांनी या चर्चेला अजून दुजोरा दिलेला नाही .
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील दत्ता घोडके यांची मुलगी मोनिका हिचा विवाह दहा महिन्यांपूर्वी सोमठाणा येथील बळीराम नागवे यांच्या सोबत झाला होता. मात्र लग्नानंतर मोनिकाचे सासरी मन लागत नसल्याने ती माहेरी निघून आली. दरम्यान तिने सासरच्या मंडळींविरुद्ध महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद सुरू झाला होता. दरम्यानच्या काळात दोन्ही कुटुंबात बैठक झाली व २८ मे रोजी सायंकाळी मोनिका सासरी गेली.
परंतु दोन दिवसांपूर्वी सासरी आलेली मोनिका हिने घरातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तर दुसरीकडे वरुडी येथील २२ वर्षीय युवक दिपक बबन शिंदे याने स्वतःच्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंपाच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे वरुडी येथील दोघांची आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली.
या घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना कळविण्यात आली असता, पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत, जमादार नितीन ढिलपे, शिवाजी भगत आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी:











































