पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी दोन समित्या; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

33

पुणे, २५ मे २०२३: पालखी सोहळ्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला नियोजन करेल. तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात दुसरी समिती नियोजन करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

पालखी सोहळा आढावा बैठक आज चंदकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही पालखी मार्गावर हरित वारीचे नियोजन केले जाते. रस्ता रुंदीकरणामुळे दोन्ही मार्गावरील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सावलीत बसता येत नाही. यासाठी मार्गांच्या कडेने झाडे लावावीत आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी सर्वच संस्थानांच्या प्रमुखांची तसेच अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करून ते झाडे जगवण्यासाठीचे नियोजन करावे, अशी सूचना आळंदीच्या विश्वास्तांनी केली. त्यावर सौरभ रावांनी तत्वतः मान्यता दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर