नागपूर, १७ ऑगस्ट २०२३ : नागपुरात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, ती थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशात नागपुरातून आणखी एका खुनाची बातमी समोर आली आहे. नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीव नगर बसस्थानकाजवळील टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून आलेल्या सात-आठ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून पळ काढला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (१६ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. राकेश मिश्रा (वय २७ वर्षे) आणि रवी जैस्वाल (वय २८ वर्षे, दोघे रा. राजीव नगर, हिंगणा रोड, नागपूर) अशी जखमींची नावे आहेत. मात्र राकेशचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही या भागातील आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करायचे.
या हृदयद्रावक घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच एसएचओ भीमा नरके व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. मात्र, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सध्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड