गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूरजवळ खासगी बस उलटून दोन ठार, १७ जण गंभीर

चंद्रपूरजवळ खासगी बस उलटून दोन ठार, १७ जण गंभीर

चंद्रपूर, २८ जानेवारी २०२३ : महाराष्ट्रातील चंद्रपूरहून हैदराबादकडे प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस शुक्रवारी मध्यरात्री उलटली. चंद्रपूरमधील विरूर-धानोरा मार्गावर झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना विरूर, राजुरा, चंद्रपूर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही खासगी बस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून निघाली होती आणि विरूर-धानोरा मार्गे हैदराबादला जात होती; मात्र थोडे अंतर गेल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली.

अपघाताची माहिती मिळताच विरूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले. काही जखमींना राजुरा, तर काहींना चंद्रपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला; मात्र अपघाताच्या कारणाबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास व चौकशी सुरू आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version