अकलूज, सोलापूर १३ जुलै २०२४ : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दोघांचा मृत्यु झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात छायाचित्रण करण्यासाठी आलेल्या एकाचा रिंगण सोहळ्यातील अपघाताने तर एका वारकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
पश्चिम बंगाल येथील कल्याण चट्टोपाध्याय (वय ४८) हे गुरुवारी पुरंदावडे येथे रिंगण सोहळ्याचे छायाचित्रण करीत असताना माऊलीचा अश्व धावताना पायात लगाम अडकून अडखळला आणि रिंगण पाहण्यासाठी बसलेल्या भाविकांच्या तसेच छायाचित्रण करणाऱ्या चट्टोपाध्याय यांच्या अंगावर पडला. त्यामध्ये दोघे जखमी झाले तर चट्टोपाध्याय यांना चक्कर येऊन ते बेशुध्द पडले. वैद्यकीय उपचार देण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
याबाबत पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी सदरची दु:खदायक घटना असल्याचे सांगीतले. चटोपाध्याय हे हौशी छायाचित्रकार होते. आज माळशिरस मुक्कामी आरतीमधे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच वीमा रक्कम मिळण्यासाठी आळंदी देवस्थानकडुन प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले. अकलुज पोलीस ठाण्यामधे या मृत्युची नोंद करण्यात आलीय.
न्यूज अनकट प्रतिनीधी : नवनाथ खिलारे