नवी मुंबईत इमारतीचे छत कोसळून दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

9

ठाणे, २४ ऑगस्ट २०२३ : नवी मुंबईतील नेरूळ परिसरात २० वर्षे जुन्या निवासी इमारतीचा भाग कोसळून दोन जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. बुधवारी रात्री ८.५० च्या सुमारास नेरूळच्या शिरसोली येथील चार मजली तुळशी भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग पूर्णपणे खाली आला. विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले की, छताचा काही भाग कोसळून दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर पडला, त्यात एक मजूर आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

या इमारतीला चार विभाग असून ‘बी’ विभागाच्या छताचा काही भाग कोसळला असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिसऱ्या मजल्यावर महापालिकेचे काही काम सुरू असताना छताचा काही भाग कोसळला. इमारतीच्या तळमजल्यावर टेलरचे दुकान असून, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी दुकानदाराने दुकान बंद केले होते. बाबाजी सिंगडे असे मृतांपैकी एकाचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही इमारत रिकामी करण्यात आली असून सध्या नेरूळ येथील अहिल्याबाई होळकर समाज मंदिर हॉलमध्ये रहिवाशांना ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नेरुळ आणि वाशीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. काही वेळाने ढिगारा साफ करण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्याची पाहणी केली. पालिकेच्या अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही इमारत कायदेशीर आहे आणि त्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड