पुणे, ४ नोव्हेंबर २०२२ : पुण्यातील लोकल रेल्वेनं प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाश्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज शुक्रवारी (४नोव्हेंबर) रेल्वेनं पुणे-लोणावळा मार्गावरील, पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ९.५५ वाजता लोणावळ्यासाठी सुटणारी लोकल शुक्रवारी धावणार नाही. असं रेल्वेकडून जाहीर करण्यात आलंय. यामुळं प्रवाशांना थोडा त्रास सहन करायला लागणार आहे.
या लोहमार्गावरील तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या वाहततुक व्यवस्थेत बदल करण्यात आले असल्याचं पुणे रेल्वेकडून कळवण्यात आलंय. त्यामुळं पुणे – लोणावळा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
त्याचबरोबर दुपारी २.५० वाजता लोणावळ्याहून पुण्यासाठी सोडण्यात येणारी लोकल रद्द करण्यात आलीय. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा विभागामध्ये काही तांत्रिक कामं करण्यात येणार असल्यानं या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात.
रद्द केलेल्या दोन लोकल वगळता नियमित वेळापत्रका प्रमाणं पुणे ते लोणावळा दरम्यान सकाळी आणि दुपारी धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या नियमित सुरू राहणार आहेत. प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर