मुंबई, १ सप्टेंबर २०२३ : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच तीन ठराव मांडले. आजच्या बैठकीत इंडिया आघाडीने आगामी निवडणुकांसाठीची रणनीति तयार केली आहे. या बैठकीसाठी जमलेल्या २८ पक्षांच्या नेत्यांनी बैठक पार पडल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आगामी काळात आमच्या आघाडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. आम्ही २८ पक्ष एकत्र आलो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला पराभूत करू शकतो.
देशातील ६० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत. कॉर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. इंडिया आघाडीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, या बैठकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचे मी आभार मानतो. आजच्या या बैठकीत दोन महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या. एक म्हणजे आम्ही इंडियाची समन्वय समिती गठित केली आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांबाबत राज्य स्तरावर चर्चा करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही सर्व एकत्र आल्याने भाजपला निवडणूक जिंकणे अशक्य आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे ही बैठक आयोजित केल्याबद्दल राहुल गांधी यांनी त्याचे आभार मानले आहे. देशाच्या विकासासाठी शेतकरी, कामगार आणि देशातील गरीब जनतेचा मोठा हात असतो, यांच्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत आहोत. आम्ही इंडियासाठी एकत्र आलो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे भ्रष्टाचाराचे घर झाले आहे नरेंद्र मोदी यांनी अदानी यांची चौकशी करायला पाहीजे. त्यांनी चौकशी केली नाही तर मिलिभगत असल्याचे स्पष्ट होईल असे यावेळी राहुल गांधी म्हणाले.
बैठकीत मांडलेले ठराव
१. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
२. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे