उत्तर प्रदेश, २८ एप्रिल २०२० :
पालघरमधील साधू आणि ड्रायव्हर चे हत्या प्रकरण तापलेले असतानाच उत्तर प्रदेशात दोन साधूंची मंदिरातच हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या बुलंदशहरामध्ये या दोन साधूंची गळा दाबून हत्या करण्यात आली. साधूंकडील चिमटा नेल्याच्या तक्रारीमुळे काही व्यसनींनी खून केल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. कंपाऊंड रूममध्ये दोघांचे मृतदेह अत्यावस्थेत सापडले आहेत. त्यांच्याकडील चिमटा नेल्याची तक्रार साधूने केल्यावर काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुरारी असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले. ते शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. साधूंच्या हत्येची बातमी परिसरात पसरल्यामुळे घटनास्थळी पोलिसांची आणि लोकांची गर्दी जमा झाली आहे.