दौंड दि १३ मे २०२० : दौंड येथील राज्य राखीव बल क्रमांक ७ मधील आणखी दोन जवानांचा कोरोना तपासणी अहवाल हा पॉजिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाच्या काळजीत भर पडली आहे.
यापुर्वी झालेल्या तपासणी अहवालातील जवळपास आठ रुग्ण बरे झाल्याची सकारात्मक बातमी येत असताना आलेल्या नवीन अहवालातील बाधीत रुग्णांच्या संख्येने तालुक्यातील चिंता वाढवली आहे. मात्र याचा प्रसार सध्या फक्त राज्य राखीव बलाच्या पर्यंत मर्यादीत असल्याने याबाबत प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे.
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यवहार देखील एका दिवसाच्या अंतराने मर्यादित काळासाठी सुरू करण्यात आलेले आहेत. राज्य राखीव बलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी बाहेर जात असल्याने त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी आमदार राहुल कुल यांच्या मार्फत घेतली जात आहे. तालुक्यातील प्राथमीक आरोग्य केंद्र व इतर शासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाच्या संसर्ग रोखण्याच्या किट वाटण्यात आल्या आहेत. सर्व सामान्य नागरिकांना या संसर्गापासून दूर राखण्यात प्रशासनाला यश आल्यानेच ग्रामीण अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख