कामावर रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अडचणींचे दोन पानी पत्रक

मुंबई, दि. २३ मे २०२०: कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात प्रशासनाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्यासाठी आदेश दिले होते. कोरोनाव्हायरस संसर्ग अतिशय वेगाने पसरत असल्यामुळे लॉक डाउन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे सर्व दळणवळण यंत्रणा बंद होती. परिणामी येण्या-जाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. परंतु आता सरकारने बर्‍यापैकी शिथिलता देत सर्व गोष्टी सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

कामकाजाचा एकंदरीत ताण पाहता प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते, मात्र कर्मचाऱ्यांकडून कामावर हजर राहण्यासाठी तब्बल दोन पानांच्या अडचणी सरकारसमोर सादर केल्या आहेत. कर्मचारी वर्गाकडून असे सांगण्यात आले आहे की, कामावर येणारे कर्मचारी हे वेगवेगळ्या भागातून येणारे आहेत. बस, रेल्वे किंवा इतर सार्वजनिक वाहनांतून ते ये-जा करत असतात. परंतु, सध्या ही व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यक्षम नसल्याने त्यांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कर्मचार्‍यांना त्यांच्या स्थानिक भागातील कार्यालयामध्ये रुजू होण्यास परवानगी द्यावी जेणेकरून त्यांना ये-जा करणे टाळता येईल.

कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व अत्यावश्यक गोष्टी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात मास्क, पी पी ई किट, त्यांची खाण्याची व्यवस्था, संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असणारी औषधे इत्यादींचा कर्मचाऱ्यांना पुरवठा करावा अशी मागणी एका पत्रकाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर संसर्ग झाल्यानंतर जर एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू होत असेल तर एका महिन्याच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी कामावर रुजू करून घ्यावे. कर्मचाऱ्यांचा विमा काढला जावा. हा विमा ५० लाखापर्यंतचा असावा. कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी यासारखी अनेक कारणे एका पत्रकाद्वारे कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला पाठवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा