कर्जत, १२ ऑगस्ट २०२०: कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा या ठिकाणच्या चौफुल्यावर श्रीगोंद्या कडून येणाऱ्या कंटेनरने मिरजगावकडून कर्जतकडे जाणाऱ्या टेम्पो (एम एच ४३ एफ ५८६) यास जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये टेम्पोतील दोन व्यक्ती टेम्पो खाली अडकल्याने जागीच ठार झाले. परंतु कंटेनर चालक पळून गेला आहे.
यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती कळविली असता उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड घटनास्थळी तातडीने पोहोचले व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने क्रेनने हा टेम्पो बाजूला करण्यात आला. अडकलेले दोन मृतदेह बाहेर काढून ॲम्बुलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालय कर्जतकडे पाठविण्यात आले.
अपघात करून पळून जाणारा कंटेनर टाकळी बाभूळगाव रस्त्यावर पकडला मात्र चालक पळून गेला. टेम्पोतील संदीप दादाराव शेरेकर वय- २७ रा. मोरखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा व भिवाजी नागेंद्र जोंधळे वय – २६, रा. सोनपल्ली, ता. श्रीकोंडा, जि. आदिलाबाद हे दोघे टॅम्पो बाहेर फेकले गेल्याने टॅम्पोखाली दबून जागीच ठार झाले. या अपघातात विष्णु राम वेनाळकर, विनोद सुभाष गुंजकर, उरळी, ता. मेहकर, जि. बुलढाणा, नितीन राजाभाऊ हुलगुडे, रा. माजलगाव, जि. बीड, गोपाला अशोक पवार, मोदखेड, ता. मेहकर, जि.बुलढाणा हे गंभीर जखमी झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष