राम मंदिरासाठी नेपाळहून आल्या दोन शाळिग्राम शिळा; अयोध्येत पूजन

अयोध्या, २ फेब्रुवारी २०२३ :उत्तर प्रदेशात अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरु आहे. पुढील वर्षी जानेवारी २०२४ पर्यंत मंदिराचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. नेपाळहून दोन शाळिग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या असून, या शिळांपासून भगवान राम आणि सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळीग्राम दगड हा जगभरात फक्त काली गंडकी नदीच्या किनारी भागात सापडतो. ही नदी नेपाळच्या मायगदी आणि मस्टँग जिल्ह्यातून वाहते. नेपाळमधील जनकपूर या ठिकाणी सीतामातेचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. याच ठिकाणाहून या शिळा राम मंदिरातील मूर्ती घडवण्यासाठी मागवण्यात आल्या आहेत आणि या शिळांचे आज अयोध्येत पूजन करण्यात आले.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी सांगितले की, नेपाळमध्ये काली गंडकी नावाचा एक धबधबा आहे. त्याचा उगम दामोदर कुंडातून होतो. गणेश्वर धाम गंडकीपासून उत्तरेकडे ८५ किलोमीटरवर हे कुंड आहे. या दोन्ही शिळा तिथून आणण्यात आल्या आहेत. या दोन्ही शिळांचं वजन अनुक्रमे ३० आणि १५ टन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • धनुष्यबाणही नेपाळहूनच येणार!

दरम्यान, मूर्तीसाठी शाळीग्राम शिळांप्रमाणेच नंतर नेपाळमधील जानकी मंदिराकडूनच श्रीराम मंदिरासाठी धनुष्यबाणही पाठवले जाणार असल्याची माहिती नेपाळ काँग्रेसचे सदस्य आणि माजी पंतप्रधान बिमलेंद्र निधी यांनी सांगितले आहे. यासंदर्भात राम मंदिर ट्रस्टशी चर्चा करून व्यवस्था केली जाईल, असेही ते म्हणाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा