औरंगाबाद, दि. ९ जुलै २०२०: औरंगाबाद मध्ये कोविड -१९ चे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरानंतर आता औरंगाबाद देखील कोविड -१९ च्या प्रभावाखाली येत आहे. हे स्पष्ट करणारी धक्कादायक घटना म्हणजे गेल्या दोन दिवसात शिवसेनेचे दोन नगरसेवक कोविड -१९ मुळे मृत्युमुखी पडले आहेत. या विषाणूचा प्रभाव पाहता प्रशासनाने पुन्हा औरंगाबाद लॉक डाऊन करण्याची घोषणा केली आहे. शहरात १० ते १८ जुलै दरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसात दोन नगरसेवक कोविड -१९ मुळे मृत्युमुखी पडल्या मुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नितीन साळवे आणि रावसाहेब आम्ले अशी या नगरसेवकांची नावं आहेत.
नितीन साळवी यांचे निधन
शिवसेनेचे उत्तम नगर बौद्धनगर वॉर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी यांना २६ जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड -१९ ची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. घाटी रुग्णालयातून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. पण त्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. शिवसेना नगरसेवकांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
रावसाहेब आम्ले यांचे निधन
पडेगावचे माजी नगरसेवक रावसाहेब आम्ले यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना काल सकाळी आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी