नाशिक, दि.२४ मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाेत असलेल्या रमजान ईदनिमित्त शहरात चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने मुस्लिम बांधवांना घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून त्यास बांधवांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहर रेड झोनमध्ये आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने नियमावली दिली असून त्यात अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. रमजान ईद असल्याने मुस्लिम बांधवांना घरातच नमाज पठन करण्याचे आवाहन केले.
धर्मगुरुंनीही घरीच इद साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यास सर्व मुस्लिम बांधवांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहर पोलिसांच्या वतीने रॅपीड ॲक्शन फोर्सचे शहरातून संचलन करण्यात आले होते. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना घरातच थांबण्याचे आवाहन केले.
दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पाेलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस उपआयुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, १६ पोलीस निरीक्षकांसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी असा २ हजारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: