त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील तेरा जणांचा अहवाल निगेटिव्ह

इंदापूर, दि. २६ मे २०२०: आज इंदापूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावातील ९ व्यक्तींचे अख्खे कुटुंब आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या ४ अशा एकूण १३ व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने प्रशासनाची झोप उडाली होती.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील एक पोलीस कर्मचारी शुक्रवार दि.१५ मे रोजी दोन दिवसाची सुट्टी काढून आपल्या मूळ गावी पळसदेव येथे आला होता. दोन दिवस घरी थांबल्यानंतर सोमवार दिनांक १८ मे रोजी पहाटे तो पुन्हा पुणे येथे कार्यरत असणाऱ्या आपल्या मुख्यालयात हजर झाला.

मात्र अचानक तब्येत बिघडल्याने तात्काळ या व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता सदर पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे इंदापूरकरांची चिंता वाढली होती.

शुक्रवार दि.२२ मे रोजी इंदापूर तालुक्यातील पोंदकुलवाडी परिसरात दोन कोरोना रुग्ण आढळून आल्याने इंदापूर तालुक्यात खळबळ माजली होती. मुंबईहून आलेल्या मायलेकरांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर इंदापूर मधील डॉ. कदम गुरुकुल याठिकाणी उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण परिसरातील जवळपास अकरा नागरिकांच्या संपर्कात आले असल्याचेही स्पष्ट झाले. त्या नंतर या अकरा नागरिकांचे स्वैब घेण्यात आले होते.

असे असतानाच पळसदेव मधील ही गंभीर घटना समोर आल्याने इंदापूर करांचा जीव टांगणीला लागला होता. या कुटुंबातील १३ सदस्यांचे कोरोना चाचणी घेतली असता सोमवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला. या सर्व कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा