मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट येत्या २७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातील एका डायलॉगमुळे अक्षय कुमार अडचणीत आला आहे. अक्षय कुमार याने प्रभू श्रीराम यांच्याबाबत अर्वाच्च शब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. यावरून अक्षय कुमार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.
राज मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटाचा नवीन ट्रेलर गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये पार्टीत आलेली एक महिला विचारते, तू सांग याचे (मुलगा) नाव होलाराम का ठेवण्यात आले आहे? याला उत्तर देताना समोरील व्यक्ती म्हणतो की, काय आहे ना, याचे नाव राम असेच होते. मात्र हा होळीच्या दिवशी जन्माला आल्याने याचे नाव होलाराम असे ठेवले. यावर मोठ्याने हसत अक्षय कुमार म्हणतो की, बरं झाले हा (मुलगा) लोहडीच्या दिवशी जन्माला नाही आला, अन्यथा याचे नाव …. अक्षय कुमारच्या या वक्तव्यावर पार्टीतील लोकही हैराण होतात.
दरम्यान, हा ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर अक्षय कुमार याच्यावर नेटकऱ्यांनी टिका केली आहे. त्या डायलॉगची छोटी क्लिप शेअर करत नेटकऱ्यांनी बकवास जोकच्या आधारे प्रभू श्रीरामा यांना शिविगाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.