मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच, आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ते कधी अयोध्येला जातील याबाबचत अनिश्चितता होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळाचे काम मार्गी लागल्यानंतर मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्याला निघतील अशी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र ते नेमके केव्हा अयोध्या दौऱ्यावर जातील हे गुलदस्त्यातच होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्च या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेनेचे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले होते. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याच प्रमाणे ते शरयू नदीतीरावर आरती करतील अशी माहितीही राऊत यांनी दिली. आता राम मंदिराचे काम सुरू होण्यात कोणतीही अडचण नसल्याचेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार असल्याचेही राऊत म्हणाले.