उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप, सरकार अपघात रोखण्यासाठी काहीच करत नाही

मुंबई, १ जुलै २०२३: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला. त्यासोबतच त्यांनी समृद्धी द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी काहीही करत नाही, असा आरोप एकनाथ शिंदे सरकारवर केला.

सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावात समृद्धी एक्स्प्रेस वेवर एका प्रवासी बसला आग लागली. त्यात एकूण २५ लोकांचा जळून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत ३३ लोक होते, त्यापैकी आठ जण सुरक्षित आहेत. बुलढाणा अपघात ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना असल्याचे सांगून ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी द्रुतगती मार्गावर गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु हे अपघात थांबवण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. आता या दुर्घटनेने सरकारचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ५२० किलोमीटर लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. या द्रुतगती महामार्गाचे अधिकृत नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा