इर्शाळवाडी च पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्या पाठिशी, उद्धव ठाकरेंची ग्रामस्थांना ग्वाही

रायगड, २२ जुलै २०२३ : खालापूरमधील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. अशातच आज इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इर्शाळवाडी पोहचले आहेत. यावेळी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देत, पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्या पाठिशी आहे, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिलं.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, तरी अनेक आदिवासी जमाती दुरापास्त पद्धतीचं जीवन जगत आहेत. त्यामुळे आता आदिवासी जमातीला प्रवाहात आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अशा धोकादायक ठिकाणी वस्त्या आहेत, त्यांच पुनर्वसन झालं पाहिजे. तसेच तीन ते चार वस्त्या मिळून एखादं गाव बसवलं पाहिजे, विशेष या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करा अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. सरकार आले किंवा गेले तरी या योजनेला स्थगिती देऊ नका असं आवाहन देखील ठाकरेंनी केलं आहे.

इर्शाळवाडीतील घटना ही सर्व राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, या दु:खाचं निवारण करण्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत पण यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तप्तर आहोत, यावेळी उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचं आणि दरडीच्या दुर्घटनेतून बचावलेल्याचं सांत्वन केलं आहे. हे क्षेत्र दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने, त्या संदर्भात सरकारसोबत संवाद साधणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आसपासच्या वस्त्या आणि तुमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करू, जेणेकरून पुन्हा अशा संकटाशी सामना करण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच वस्त्या दरडग्रस्त कधीही होऊ शकतात. पण असे म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही. ही घटना घडण्यापूर्वी येथील पुनर्वसन झालं पाहिजे होते. पण, दुर्दैवाने ही घटना घडली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा