छत्तीसगडमध्येही उद्धव ठाकरेंना झटका…

छत्तीसगड, १७ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छत्तीसगडमध्येही मोठा धक्का बसलाय. येथे शिवसेनेच्या राज्य संघटनेने ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत ​​एकनाथ शिंदे यांच्या गटावर विश्वास व्यक्त केलाय. शुक्रवारी शिवसेनेने ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला.

छत्तीसगड शिवसेना प्रमुख धनंजय परिहार, मधुकर पांडे, रेशम जांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक काही काळापूर्वी मुंबईत आले होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर धनंजयसिंह परिहार यांनी शिंदे गटावर विश्वास व्यक्त केला. धनंजय परिहार यांनी शिंदे यांना छत्तीसगडमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या ३८ आमदारांनी बंड केलं. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपशी युती करून सरकार स्थापन केलं. शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता पक्षाबाबत शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे.

शिंदे गटात सामील होत आहेत बडे नेते

त्याचवेळी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाला राज्यात पाठिंबा मिळू लागला आहे. अनेक बडे नेते उद्धव यांची बाजू सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेश म्हस्के यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची गळचेपी करत असल्याचा आरोप केलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा