आगामी गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली बैठक

मुंबई, दि. १८ जून २०२० : आगामी गणेशोत्सवातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर इत्यादी सहभागी होते.

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींना केले.

पुण्यासह इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांकडून यावर्षी कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा देण्याची ग्वाही गणेश मंडळांकडून देण्यात आली. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व गणेश मंडळाचे आभार मानले.

शिर्डी साईबाबा, मुंबईच्या सिद्धिविनायक यासारख्या संस्थांप्रमाणेच गणेश मंडळांकडूनही मुख्यमंत्री सहाय्यतानिधी कोविड -१९ साठी मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. तसेच सामाजिक उपक्रमही राबविले गेले आहेत. त्याबद्दलही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

यंदा हा उत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने उत्सव साजरा करावा लागेल असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करताना प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहोत. त्यामुळे चौकटीत राहूनच साधेपणाने उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण सर्व घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सामाजिक भान ठेवून संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव साजरा करू. गणेश मंडळांमार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा विचार करून कार्यक्रम निश्चित करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा