देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी

मुंबई, दि.३ जून २०२० : प्रशासन चालविण्याचा थोडाही अनुभव नसताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोरोना संकट चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडादेखील सर्वाधिक आहे. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंची लोकप्रियता चांगली असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

तीनच महिन्यांपूर्वी प्रचंड बहुमताने दिल्लीत सत्ता राखणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा ठाकरेंची लोकप्रियता जास्त वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

याबाबत “सी व्होटर” या संस्थेने देशातील नेत्यांच्या लोकप्रियते बाबत सर्वेक्षण करून आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वेक्षणात ६६ टक्के नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिल्याचे समोर आले आहे. तर २३ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे.

देशातली सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ३० हजाराहून अधिक जणांची मते सी-व्होटरने विचारात घेतली असून यामधून मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आढावा देखील घेण्यात आला आहे.

यात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडिशाचे नवीन पटनायक पहिल्यास्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता जवळपास ८३ टक्के इतकी आहेत. त्यांच्यानंतर छत्तीसगडचे भूपेश बघेल (८१ टक्के), केरळचे पिनरायी विजयन (८० टक्के), आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (७८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी (७६ टक्के) आहेत. ठाकरे यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक लागतो. त्यांची लोकप्रियता ७४ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या सहा नावांमध्ये एकही मुख्यमंत्री भाजपाचा नाही.

याशिवाय अतिशय कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत हरियाणाचे मनोहर लाल खट्टर पहिल्यास्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता केवळ ४.४७ टक्के आहे. त्यानंतर उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत (१७.७२ टक्के), पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग (२७.५१ टक्के), बिहारचे नितीश कुमार (३०.८४ टक्के), तमिळनाडूचे पलानीस्वामी (४१.२८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

या सर्वेक्षणातून महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवले असून, प्रशासन चालवण्याचा जराही अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वीपणे सरकार चालवत असल्याचे समोर आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा