मुंबई, दि. २६ जुलै २०२०: कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशासह राज्यात टाळेबंदी केली गेली. या ताळेबंदीला चार महिने झाले तरी राज्यात बहुतेक ठिकाणी लॉकडाउन सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले असून लॉकडाऊन सुरूच राहिले तर लोकं उपासमारीने मरतील असं वक्त्यव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसारीत केलेल्या एका व्हिडिओतून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले कि,सुरुवातीला भारतात ४० टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने सांगितले होते. त्यामुळे मीही घाबरलो होतो. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे ते म्हणाले कि, उद्धव ठाकरेंना विनंती आहे, खुदा होऊ नका. कोरोनामुळे दगावणाऱ्यांचं प्रमाण २% असून अकारण भिण्याची गरज नाही. बुद्धाने म्हटल्याप्रमाणे जो जन्माला आला तो मरणारच आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचे कार्य हाती न घेतल्यास माणसे उपासमारीने मरतील. लॉकडाउन वाढवू नये अशी आमची मागणी आहे.