उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार… संजय राऊत यांची माहिती

मुंबई, २२ जुलै, २०२२: शिवसेनेला भगदाड पडल्याची प्रक्रिया सुरुच असताना, आता संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे विधान त्यांनी आज केले. सध्या शिवसेनेची गळती सुरुच आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु करत पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. या यात्रेत ते बंडखोर नेत्यांवर आरोपही करत आहे.

शिवसेनेत सगळ्यात जास्त त्रास हा संजय राऊत यांच्यामुळे होत आहे. तेव्हा त्यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलो. तसेच उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाही, अशा तक्रारींचा सूरदेखील ऐकण्यात येत होता. काही नेत्यांनी तर हे उघडपणे बोलून दाखवले आहे. तरीही हे विधान उद्धव ठाकरेंच्या ऐवजी संजय राऊतांच्या तोंडून यावे, याला काय म्हणावे?

उद्धव ठाकरे हे मविआ मुख्यमंत्री असताना नेत्यांना, कार्यकर्त्यांना भेटत नव्हते. पण हेच उद्धव ठाकरे आता नेत्यांना भेटणार. कार्यकर्त्यांची भेट घेणार. असे सांगितल्यामुळे आता विरोधकांच्या कदाचित भुवया उंचावण्याची शक्यता आहे. जे आधी करायला हवं, ते आता केल्याने काय साध्य होणार, हे केवळ संजय राऊतांनाच ठाऊक असावे, यासाठीच तर त्यांनी हे विधान केलं असावं असा तर्क लावला जात आहे. ज्यामुळे शिवसेनेचे खिंडार बुजायला सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त करुयात. पण यापेक्षाही जी मनं शिवसेनेत दुखावली आहे, ती दुखरी मने आता एकत्र येतील का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीशी युती करुन आधीच अनेकांना दुखावलं आहे. पण त्यापेक्षा आता ते दौऱ्यात येऊन सकारात्मक बोलणार की पुन्हा शिंदेगट आणि भाजपवर आरोप करणार हे, पहावं लागेल. आणि बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा खंबीरपणे उभी राहणार का, असा सवालही उठवला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा