मुंबई, 23 जून 2022: मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांच्या बाजू बदलण्याची प्रक्रिया सुरूच आहे. बुधवारी रात्री शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीतील शिंदे गटात सामील झाले आहेत. एवढंच नाही तर आणखी दोन आमदार आज गुवाहाटीला जाऊ शकतात.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास शिवसेनेचे चार आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे इतर बंडखोर आमदारांसह या हॉटेलमध्ये थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे चार आमदार महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले होते. गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये गुलाबराव पाटील आणि योगेश कदम यांचाही समावेश आहे.
आणखी दोन आमदार गुवाहाटीला जाऊ शकतात
आज कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर आणि दादरचे आमदार सदा सरवणकर हेही शिंदे गटात पोहोचू शकतात. मुंबईतही शिवसेनेचे तीन आमदार शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोलले जातं. दाव्याप्रमाणे हे आमदार शिंदे छावणीत सामील झाल्यास शिंदेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 36 वर पोहोचेल, तर इतर 12 आमदारही शिंदे यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, काल शिंदे गटाने 34 आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना विधीमंडळ पक्षनेते असल्याचं पत्रात म्हटलं आहे. भरत गोगावले यांची नवे मुख्य व्हीप म्हणून निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची मंगळवारी शिवसेनेने विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे