रुग्णालयांसाठी उद्धव ठाकरेंचे नविन निर्देश

मुंबई, ३० एप्रिल २०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नविन निर्देश काढले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार शासनामार्फत अधिसूचना निर्गमित मुंबईतील कोविड १९ रुग्णांची संख्या पाहता त्यांना वेळेवर उपचार मिळावेत, कुणीही त्यापासून वंचित राहू नये असे सांगण्यात आले. तसेच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी असे देखील त्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरातील रुग्णवाहिकांचे नियंत्रण मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून करण्यात यावे. जेणेकरून रुग्णवाहिकांची ने-आण करताना सुसूत्रता येईल. कुठलाही रुग्ण रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. अशावेळी जागेच्या उपलब्धतेनुसार तेथे रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून रुग्ण तपासणी केली जावी.

रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र हलविणे, दाखल करून घेणे आणि घरी सोडणे याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी. मुंबईतील रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांच्या अचूक व्यवस्थापनासाठी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात यावा. हा क्रमांक मुंबई महापालिकेच्या २४ तास कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिला जावा. विशिष्ट ओळख क्रमांक असल्याशिवाय त्याला दाखल करून घेतले जाऊ नये. या कार्यपद्धतीमुळे कुठल्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत याची निश्चित माहिती मिळू शकेल.

कोविड-१९ संशयित रुग्णांना उपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन दाखल करावे. त्यांचा नमुना अहवाल १२ तासात मिळेल अशी व्यवस्था करावी, रुग्णाला असलेल्या त्रासानुसार त्याला कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे हलविण्यात यावे. कोविड-१९ रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाने अर्ध्या तासाच्या आत मृतदेह वॉर्ड मधून हलविण्याबाबत कार्यवाही करावी. ठरविलेल्या कार्यपद्धतीनुसार १२ तासाच्या आत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार असल्याचे ही या निर्देशामध्ये म्हंटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा