गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे मनपाची ७० मीटरहून उंच इमारतींच्या अग्निशमन यंत्रणांची ‘सरप्राईज तपासणी’बंद

पुणे मनपाची ७० मीटरहून उंच इमारतींच्या अग्निशमन यंत्रणांची ‘सरप्राईज तपासणी’बंद

उंड्री येथील एका सोसायटीत आग लागून मोठी दुर्घटना घडल्यानंतर पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला जाग आली आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिका क्षेत्रातील ७० मीटरपेक्षा अधिक उंच असलेल्या सर्व इमारतींच्या अग्निशमन यंत्रणांची अचानक आणि कसून तपासणी केली जाणार आहे. या तपासणीदरम्यान इमारतीमधील आग प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित नसतील किंवा बंद आढळल्यास, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

उंड्रीच्या घटनेत १४ मजली इमारतीत अत्याधुनिक यंत्रणा असूनही ती प्रत्यक्षात सुरू नव्हती. त्यामुळे अग्निशमन दलाला बाराव्या मजल्यापर्यंत होज पाईप घेऊन जाण्याचा त्रास झाला. या घटनेतून बोध घेत महापालिकेने सर्व निवासी, व्यावसायिक संकुले, हॉस्पिटल्स, मॉल्स आणि हॉटेल्स यांना त्यांच्या इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आणि सुस्थितीत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी स्पष्ट केले आहे की, ही यंत्रणा केवळ दिखाव्यासाठी नसते; ती प्रत्येक रहिवाशाच्या सुरक्षिततेसाठी लावलेली असते. त्यामुळे सोसायटीने वर्षातून दोन वेळा परवानाधारक एजन्सीकडून तपासणी करून महापालिकेला अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास आणि भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीचा मालक किंवा भोगवटादार यांचीच राहील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आता या अचानक होणाऱ्या तपासणीमुळे उंच इमारतींच्या सोसायट्या आणि मालकांचे धाबे दणाणले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version