बारामती, २९ सप्टेंबर २०२०: बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार ते जराडवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मागील काही महिन्यापांसुन पडणाऱ्या पावसाळामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालक वैतागून गेले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच अंदाज न आल्याने वाहने आदळत आहेत. वाहनांचे नुकसान तर होतच आहे. त्याचबरोबर प्रवाशांना पाठीच्या मनक्याचा ञास देखील होत आहे. दिवसेंदिवस या खड्यांमध्ये वाढ होत आहे. ठिकठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर आलेली काटेरी वेडीवाकडी झाडेझुडपे देखील धोकादायक ठरत आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे देखील बोलले जात आहे. संभाव्य धोके विचारात घेऊन या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीची अनेक दिवसांपासून ग्रामस्थांची व वाहनचालकांची मागणी आहे. प्रशासनाकडून याची तात्काळ दखल घेऊन रस्ते दुरूस्ती करण्यात यावी. – कांतीलाल बगाडे (ग्रामस्थ,उंडवडी कडेपठार).
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव