यवतमाळ, दिनांक १० सप्टेंबर २०२२ : विघ्नहर्ता म्हणून गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. संकट मोचक म्हणून गणराया माणसाच्या मदतीला धावून येतो ही मनोभावे भाविकांची श्रद्धा आहे. परंतु गणेश विसर्जना दिवशीच यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये येत असलेल्या महागाव येथे, गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान बबनराव गावंडे अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृत दोघेजण आपल्या मित्रांसह घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी नाल्यावर गेले होते. यावेळी गणपती विसर्जन करून ते दोघे घरी परत आले. परंतु नंतर गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहायला दोघेजण परत नाल्यावर गेले. मात्र परत त्या ठिकाणी गेल्यावर हे दोन्ही मित्र नाल्यात बुडाले.
हे दोघे जण पाण्यात बुडाल्याचे समजतात नागरिकांनी तत्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि आर्णी ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परंतु त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही पाहिले नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णालयात डॉक्टरांनी बराच वेळ त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना ऑक्सीजन सुद्धा लावले नाही. डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजी पणामुळे आमच्या मुलांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप मृतांचे नातेवाईक करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात काही काळ ताण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गणपती विसर्जना दिवशीच या दोन मुलांवर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.