नवी दिल्ली, १ जुलै २०२३: देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. या महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबतचे विधेयक सादर होण्याची दाट शक्यता अशी उच्चपदस्थ सूत्रांनी माहिती दिली. दरम्यान संसदीय स्थायी समितीनेही सोमवारी या विषयावर होणाऱ्या बैठकीस विधी-आयोगास चर्चेसाठी बोलावले आहे.
अमेरिका आणि इजिप्त दौऱ्याहून परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका देशात दोन कायदे चालणार नसल्याचे स्पष्ट करीत समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले होते, या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. यासंदर्भात संसदीय स्थायी समितीने विधी आयोगाच्या सदस्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. विधी आयोग आणि स्थायी समितीमध्ये ३ जुलै रोजी चर्चा होणार आहे.
यूसीसीच्या प्रस्तावित मसुद्यावर यामध्ये चर्चा होईल. पावसाळी अधिवेशनात संसदेत विधेयक सादर करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विधी आयोगाने १४ जून रोजी बैठकीसाठीची नोटीस जारी केली असुन देशातील विविध धार्मिक संस्था तसेच सर्व घटकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी आयोगाने एक महिन्याची मुदत दिली आहे. ३ जुलै रोजीच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर