केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी डॉ.पंजाबराव देशमुखांना भारतरत्न देण्यासाठी घेतला पुढाकार

नागपूर १७ जुलै २०२४ : कृषी आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना ‘भारतरत्न’ ही उपाधी मिळण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. ते माझे कर्तव्यच आहे.आपण फक्त एक प्रस्ताव तयार करून माझ्या दिल्लीच्या बंगल्यावर या. आपण सर्व शक्तीनिशी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू”* असे उद्गार केंद्रीयमंत्री नितीन गडकरीं यांनी नागपूर येथे काढले.

शिक्षण महर्षी व कृषी महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार यासाठी पुढाकार घेणारे दिल्लीच्या अखिल भारतीय कुर्मी महासभेचे केंद्रीय सदस्य व सुप्रीम कोर्टाचे सीनियर ॲड.के के.चौधरी आणि डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची भेट निवासस्थानी घेतली असता, त्यांनी हे आश्वासन दिले. याप्रसंगी नितीन गडकरीचे विश्वासू सहकारी सुधीर दिवे तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी बाळासाहेब ठेंग हे उपस्थित होते. डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केवळ महाराष्ट्रासाठी नाहीच तर संपूर्ण देशात कृषी क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. ते भारत देशाचे कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी केलेले कार्य आजही चर्चित आहे. विपरीत परिस्थिती असताना त्यांनी ह्या सर्व बाबी केलेल्या आहेत. १९३२ मध्ये शिक्षणाची गंगा विदर्भात आणण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. आजच्या घडीला या संस्थेचे जाळे सर्वत्र पसरलेले आहेत.

अशा या महापुरुषाला भारतरत्न ही उपाधी देण्यात यावी यासाठी ॲड.के.के.चौधरी या सुप्रीम कोर्टाच्या सीनियर वकीलाने पुढाकार घेतला असून अमरावतीला येऊन सर्व संबंधिताची भेट घेऊन नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना याची माहिती दिली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न ही उपाधी देण्यास हिरवी झेंडी दाखवली असून प्रस्ताव दाखल करण्यास सांगणे ही महत्त्वपूर्ण बाब घडून आलेली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न उपाधी मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. त्यांनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल उच्च स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा