250 years of tradition,What exactly is Tadkadtai in Sangli:सांगली शहरात जेष्ठ महिन्यातील आषाढी अमावस्येला एक अनोखा उत्सव साजरा होतो, तो म्हणजे तडकडताईचा खेळ! अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी हि तडकडताई. सांगलीकरांची लाडकी आणि थोडी भयानक अशी जिला लोक प्रेमाने “भूताची आई” म्हणतात, सांगलीच्या गल्लीबोळात फिरते आणि सर्वांना आपल्या सुपाने खेळकरपणे “प्रसाद” देते. ही परंपरा गेल्या 250 वर्षांपासून सांगलीत जपली जात आहे.
तडकडताईचा इतिहास;
सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत आणि पळण्याची लगबग पसरलीय भुताची आई असलेली तडकडताई मुळे.. जेष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मरर्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते. जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरवात होते. तडकडताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो. ही परंपरा गेल्या 250 वर्षापासून सांगलीत सुरू आहे.. कर्नाटक मधील बदामी येथून 7 वाट्या मानव लोकांनी पळवून आणल्या होत्या. त्यातली वाटी एक सांगली, आष्टा, कासेगाव, पलूस, कवठेपिरान अश्या ठिकाणी आल्या आहेत. त्यावेळी पासून ही प्रथा सुरू आहे.. याच वाटीच्या आधारे तडकडताईचा अवतार सांगलीत अवतरला. कुंभार घराण्याकडे या परंपरेचा मान आहे, आणि तेव्हापासून ही प्रथा अखंडपणे सुरू आहे.
तडकडताईचा थरार;

तडकडताईचा खेळ जेष्ठ अमावस्येला संध्याकाळी 4 वाजता सुरू होतो. काळी साडी नेसून, चेहऱ्यावर भयानक मुखवटा घालून आणि हातात सूप घेऊन तडकडताई सांगलीच्या रस्त्यांवर धावत फिरते. तिच्या या वेशामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच थोडी धडकी भरते! सिद्धार्थ परिसरातून तिच्या खेळाला सुरुवात होते आणि पुढील आठ दिवस ती शहरातील गल्लीबोळात फिरते. या काळात ती मुलांना सुपाने हलकेच मारते, ज्याला लोक “प्रसाद” म्हणतात. अशी मान्यता आहे की, या सुपाच्या मारााने मुलांवरील इडा-पिडा दूर होते.
तडकडताईचे लग्न;
तडकडताईच्या खेळाचा खास भाग म्हणजे तिच्या लग्नाची मिरवणूक. कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे ही मिरवणूक स्मशानात जाते. संध्याकाळी 6 वाजता सूर्य मावळताना गव्हाच्या अक्षतांनी तडकडताईचा विवाह पार पडतो. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित असतात. हा अनोखा विवाहसोहळा पाहण्यासाठी सांगलीकरांची गर्दी उसळते.
सांगलीची सांस्कृतिक परंपरा;
जोगण्या उत्सवाचा हा खेळ सांगलीच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तडकडताईचा दरारा इतका आहे की, लहान मुले तिला पाहून पळतात, तर मोठ्यांनाही तिच्या खेळाची मजा अनुभवायला आवडते. आषाढी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत ती शहरातील ठराविक भागांत जाऊन जोगवा मागते. हा खेळ पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी सांगलीत उत्साहाचे वातावरण असते.
आजही जिवंत परंपरा;
संस्थान काळापासून सुरू असलेली ही परंपरा आज 21व्या शतकातही तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते. तडकडताईचा खेळ सांगलीच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अनोखा पैलू आहे. लहान मुलांमध्ये थोडी भीती, थोडी मजा आणि प्रचंड उत्साह घेऊन येणारी तडकडताई सांगलीकरांच्या मनात कायमच खास स्थान राखते.
तडकडताईचा हा थरारक खेळ सांगलीच्या गल्लीबोळात पुन्हा एकदा उत्साह निर्माण करतो, आणि ही परंपरा पुढेही असाच आनंद देत राहील यात शंका नाही!
न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे















































