“एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास” …

मुंबई, २८ ऑगस्ट २०२०: कोरोनामुळे यावेळेस विद्यार्थ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. यंदा दहावी-बारावीचा देखील एक पेपर रद्द करण्यात आला होता . अशातच गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अंतिम परीक्षा होणार की नाही यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, आज सुप्रीम कोर्टानं अंतिम परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत राज्य सरकारने या परीक्षा न घेण्याबाबत निर्णय घेतला होता तर दुसरीकडे भाजपने या निर्णयाला विरोध करत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाव्यात व त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावं अशी मागणी धरली होती.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयानंतर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरुंना विश्वासात घेतलं नाही, शिक्षण तज्ज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.

याचबरोबर त्यांनी सरकारवर खोचक टोला लगावत म्हटलं की, एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास झाला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार…! ऐकतो कोण? अखेर सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला! महाराष्ट्रातील “पाडून दाखवा सरकारने” स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले!” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा