पुणे, १६ एप्रिल २०२३: पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, धनकवडी, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, आंबेगाव आणि फुरसुंगी उपनगरांत जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी गाराही पडल्या. कात्रज घाटात गारांचा थर साचल्याने वाहतूक मंदावली. बिबवेवाडीसह काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कात्रज, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, भिलारवाडी या परिसरात ढग दाटून वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारांही पडल्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याच्या घटनाही घडल्या. दत्तनगर येथील विजेच्या रोहित्राला लागलेली आग कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.
फुरसुंगी, उरुळी देवाची, परिसरात अवकाळी पावसाने चांगलेच धुतले आहे. होळकरवाडी, औतडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठले होते. यामुळे मंतरवाडी चौक, हांडेवाडी चौक, भेकराईनगर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. सर्व रस्ते जलमय झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर