मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू

मुंबई, २१ मार्च २०२३ : आज (२१ मार्च, मंगळवार) सकाळपासून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झालीय . त्यामुळं मुंबईच्या लोकल गाड्या १० ते १५ मिनिटं उशिरानं धावत आहेत. रस्त्यांवरील वाहतूकही मंदावलीय. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील तीन-चार तासांत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि ३०-४० किमी वेगानं वारे, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासून आणि आज सकाळपासून अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळं नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अनेक आमदार विधानसभा आणि विधानपरिषदेत उशिरा पोहोचले. त्यामुळं अनेक विषयांवर उशिराने चर्चा सुरू झाली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील आठ-नऊ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय. यानंतर मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. मात्र, मुंबई सेंट्रल आणि वेस्टर्न लोकल उशिरानं धावत आहेत.

मुंबई-ठाणे आणि परिसरात सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर येथे पाऊस पडत आहे. तसेच डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे पावसाला सुरुवात झालीय. पहाटे साडेपाच वाजल्यापासून पाऊस सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी बस काही काळ थांबून पुन्हा सुरू झाली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा