पुरंदर (नीरा), ८ डिसेंबर २०२०: केंद्र सरकारच्या शेती सुधारणा विधेयका विरोधात दिल्ली येथे मोठं आंदोलन सुरु आहे. पंजाब, हरयाणासह देशभरातील शेतकरी सलग १२ दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी विविध शेतकरी संघटना, देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शवत भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशभरातून सकाळ पासूनच मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथील प्रमुख बाजारपेठेच्या शहरांसह ग्रामीण भागातही शेतकऱ्यांसह व्यावसायीकांनी बंदला उत्स्फुर्त असा १०० टक्के प्रतिसाद दिला.
नीरा शहरात सोमवारी रात्री उशिरा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं भारत बंदला व्यावसायिकांनी पाठिंबा देऊन सहकाऱ्य करावं असं आवाहन केलं. त्या आवाहनाला नीरेकर व्यापाऱ्यानी मंगळवारी सकाळ पासुनच प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवीला.
नीरा येथील बाजारपेठेतील सर्व व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत दिवसभर आपली अस्थापनं बंद ठेवली. हॉटेल, स्विटमार्ट, कापड व्यावसायिक, किराणा मालाची दुकानं, भाजीपाला, फळ विक्रेते, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक शॉप, चहाची टपरीसह देशी – विदेशी मद्यालय संपूर्ण दिवसभर बंद होती.
प्रमुख राजकीय पक्ष आंदोलनापासून राहिले दूर
नीरा येथील प्रमुख राजकीय पक्षाचा या आंदोलनात सहभाग पाहायला मिळाला नाही. काल रात्री उशिरा पर्यंत आंदोलना बाबत कोण प्रमुख भूमिका घेतो याकडं व्यापाऱ्यांचं लक्ष लागलं होतं. निरेतील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी कोणी ही बंद मध्ये सहभागी होण्याबाबत व्यापाऱ्यांना आवाहन केलं नाही. रात्री उशिरा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीनं व्यापाऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. या नंतर व्यापाऱ्यांनी या बंद मध्ये उस्पूर्त सहभाग घेतला. मात्र, कोणत्याच राजकीय पक्षाने शेतकऱ्यांची बाजू लावून न धरल्यानं स्थानिक पक्ष नेत्यांबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे