उरुळी कांचनमध्ये जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही गटांवर गुन्हा दाखल

उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात स्मशानभूमीजवळ शेतजमिनीवर लाईटचा खांब उभारण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीमध्ये झाले असून, या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गट नंबर १११३ मधील जमिनीवर सुभाष बगाडे (रा. बगाडे मळा, उरुळी कांचन) हे कामगारांसह लाईटचा खांब उभारत होते. त्यावेळी निर्भय राजेंद्र कांचन यांनी आक्षेप घेत ‘हा खांब आमच्या शेतात उभारू नका’ असे सांगितले. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला.

यानंतर निर्भय कांचन आणि त्यांचा मामेभाऊ निशांत अंकुश कोतवाल भवरापूरकडे जात असताना सातुबाई मंदिराजवळ त्यांना अडवून सुभाष बगाडे आणि इतर तिघांनी शिवीगाळ करून दमदाटी केली व मारहाण केली.

दरम्यान, दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र जालिंदर कांचन, त्यांचे नातेवाईक कोतवाल आणि इतरांनी बेकायदेशीर जमाव जमवून आदित्य बसवराज पात्रे, प्रशांत अशोक टिळेकर, विक्रांत आबाजी बगाडे, सुवास घोडके, कदम बगाडे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दगडफेक, जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील