शिंदवणे, दि. १५ जून २०२० : शिंदवणे या घाटात अतिशय तीव्र उतार, अवघड वळणे आणि संरक्षक कठड्याचा अभाव यामुळे शिंदवणे घाट मृत्यूचा सापळा बनला आहे.
जेजुरीहून सोलापूर रस्त्यावर येणाऱ्यांसाठी जवळचा रस्ता म्हणून शिंदवणे घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, या घाटात अतिशय तीव्र उतार, अवघड वळणे आणि संरक्षक कठडयाचा अभाव यामुळे शिंदवणे घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटात गेल्या कित्येक वर्षे सातत्याने अपघात होत आहेत व या घाटातून येणाऱ्या – जाणाऱ्या महिलांवर कित्येक वेळेस बलात्कारही करण्यात आले आहेत. हे झाल्यानंतरही त्यात बदल झालेला नाही. रस्त्याचे काम चालू आहे. मात्र ते कित्येक दिवसापासून बंदच आहे व रस्तेही खोदून ठेवले आहेत. वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
जेजुरी ते सोलापूर रस्ता या दरम्यान हा जवळचा मार्ग आहे. त्यात पुणे शहरात वाहतूक कोंडी असल्यामुळे बरेच जण या रस्त्याचा वापर करतात. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. शिंदवणे घाटात झालेल्या अपघातात अनेक तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर काही महिलांवर अत्याचार तसेच, या रस्त्यावर असे अनेक अपघात झाले आहेत. याबाबत वेळोवेळी स्थानिक नेते आणि प्रशासनाकडे या ठिकाणी कठडे बांधण्याची मागणी करण्यात आली.
भर रस्त्यात मोठे – मोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिरुर मतदार संघातील शिंदवणे हे शेवटचे गाव आहे. त्यामुळे शिरुर मतदार संघातील नेत्यांचे या गावाकडे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले आहे. या घाटात धोकादायक वळण, अपघात प्रवण क्षेत्र अशा सूचनांचे फलक लावलेले नाहीत, अशी माहिती येथील स्थानिक लोकांनी दिली.
स्थानिक लोकांनी असे सांगितले की अलीकडे या रस्त्यावर वाहनांची रहदारी वाढली आहे. शिंदवणे घाटात एकापाठो-पाठ तीव्र वळणे आहेत. त्यामुळे नवीन चालकाला ती पटकन समजत नाहीत. थोडीशी जरी चूक झाली तरी अपघात होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी नवीन व्यक्तीला वाहन चालविणे या ठिकाणी अवघड आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अवघड वळणे काढून, या रस्त्यावर कठडे बांधावेत म्हणून शासनाकडे मागणी केली आहे. पण त्यावर प्रशासनाने डोळे झाक केली आहे. आजपर्यंत काहीच होताना दिसून आले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे