गोल पोस्ट आरोग्य पुण्यातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी “बारामती पॅटर्न” वापरा : अजित पवार

पुण्यातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी “बारामती पॅटर्न” वापरा : अजित पवार

पुणे, दि. १ मे २०२० : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे बारामती पॅटर्ननुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) पुणे येथे दिले.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्या त्या विभागांकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या व मृत्यू दर कमी करणे गरजेचे आहे. महानगरपालिकांतर्गत असणाऱ्या हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवावी.
कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यासाठी सहभाग घ्यावा. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या त्या भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काटेकोर नियोजन करुन त्यानुसार समन्वय ठेवून अंमलबजावणी करावी. तसेच अति संवेदनशील भागात टेस्टींगचे प्रमाण वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याबाबत विचार करा. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून झोपडपट्टी परिसरात तपासणी वाढवून या भागातील स्वच्छतेवर भर द्यावा. तसेच येथील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप लवकरात लवकर करा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच कंटेंटमेंट भागात पोलीस प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. या परिसरातील नागरिक अन्य भागात ये-जा करु नयेत याची खबरदारी घ्यावी. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करावे. नागरिकांनीही सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अशा सामाजिक शिष्टाचाराबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सद्य परिस्थितीत घालून दिलेले निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करा, असे सांगून यासाठी राज्यशासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे खासगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत दोन्ही महापालिका आयुक्तांनी कडक निर्देश द्यावेत, अशा सूचना करुन ते म्हणाले, ससून रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांची खाजगी हॉटेलमध्ये सोय करण्यात येत असून त्या धर्तीवर कोरोना विषयक कामातील पोलीसांची देखील हॉटेलमध्ये सोय उपलब्ध करुन द्यावी.
पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशी जास्त रुग्ण संख्या असणारी शहरे वगळून अन्य ठिकाणी इंडस्ट्री सुरु करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. येथील ग्रामीण भागातील कारखानदारी सुरु करण्यासाठी नियोजन करावे. तथापि, यासाठी आवश्यक त्या नियमांचे व सामाजिक शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर शहरी भागातील कंटेंटमेंट भाग वगळता अन्य भागातील कारखानदारी बाबतही नियोजन करावे. निवारागृहात असलेल्या कामगारांना चोख सोयी- सुविधा पुरवाव्यात तसेच पर राज्यातील मजुर, कामगारांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिका-यांनी एकमेकांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी :

error: Content is protected !!
Exit mobile version