नाशिक,९ जुलै २०२३ : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या पाटण्यात झालेल्या बैठकीवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी प्रमुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घोटाळ्याचे आरोप केले होते. तर पवार यांना त्यांच्या मुलीचे कल्याण करायचे आहे असा आरोप मोदींनी केला होता. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेतील घोटाळा असे राष्ट्रवादीवर ७०हजार कोटी रूपयांचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता.
त्यानंतरच आठच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आणि अजित पवार यांनी बंड केले. शिवसेना भाजप सरकार मध्ये सामील होऊन त्यांनी आपल्याबरोबर नऊ आमदारांचा शपथविधी घडवून आणला.त्याचबरोबर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. यावरूनच शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा सुरू करून नाशिकमध्ये येवल्यात छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच पहिली सभा घेतली.
यावेळी पवार यांनी बंडखोरी करण्याऱ्यांवर निशाना साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हानच दिले. यावेळी मोदी यांनी केलेल्या आरोपांवर पवार यांनी आव्हान करताना, जर आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारामध्ये सहभागी असेल तर तुमच्याकडे असेल नसेल ती सत्ता वापरा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा, सखोल प्रकरणात जा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेला असेल त्याला पाहिजे ती सजा द्या, आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपकडून यावर काय उत्तर येत हे पहावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर