गोल पोस्ट कट्टा संस्कृती पुण्यात कचरा कुंड्यांचा विसर्जनासाठी फिरते हौद म्हणून वापर?

पुण्यात कचरा कुंड्यांचा विसर्जनासाठी फिरते हौद म्हणून वापर?

पुणे, २४ ऑगस्ट २०२० : पुण्यात सध्या विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या हौदावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हे फिरते हौद म्हणजे कचरा कुंड्याच असल्याचा गंभीर आरोप करत विसर्जन बंद पाडले होते. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी याच मुद्यावरून आजही महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांनाच उचलून नेले आणि हे आंदोलन हाणून पाडले. हे कचरा कुंड्या असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ भलतेच संतापले आहेत. आज महापौरांनी थेट कचराकुंडी आणि फिरते हौद समोरासमोर आणून विरोधकांना प्रतिउत्तर देत खोटे पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला.

विसर्जनाच्या पावित्र्य भंगाचा गंभीर आरोप झाल्याने महापौरांनी थेट कचरा कुंडी आणि फिरते हौदाच्या गाड्याच माध्यमांसमोर उभ्या केल्या. आयुक्तांनाही त्यासाठी सोबत घेतले. गणेश विसर्जनासारख्या पवित्र विषयावरून विरोधक घाणेरडे राजकारण करत असल्याचा पलटवार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला.

दरम्यान, महापौरांचे आरोप मनसेने फेटाळून लावले आहेत. आधी पुणेकरांना महापौरांनी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मग बोलावे असा प्रत्यारोप मनसेचे नेते बाबु वागसकर यांनी केला आहे. पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळी नदीपात्रातील विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. पण मग विसर्जनाला पर्याय काय असा सवाल विरोधकांनी करताच पालिकेने फिरते हौद पुढे केले आणि याच फिरत्या हौदांवरून राजकारण पेटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version