जिंकण्याची ज्याची क्षमता, त्याची जागा हाच फॉर्म्युला वापरा, पुण्याच्या जागेवरून संजय राऊत यांचे ट्विट

मुंबई,२९ मे २०२३ : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. पुण्यात आमची सर्वात जास्त ताकद आहे. त्यामुळे पुण्याची जागा आम्हाला सोडली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर अजित पवार यांच्या या मागणीवर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा आमचा पारंपारिक बालेकिल्ला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आता या वादात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. राऊत यांनी एक ट्विट केले आहे.

ज्याची जिंकण्याची क्षमता आहे त्याची जागा, हे सूत्र ठरले तर कसबा विधानसभे प्रमाणे, पुणे लोकसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल!, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटमधून काँग्रेसला एकप्रकारे त्याग करण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते त्यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी पुण्यात बोलताना पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. पुणे लोकसभा मतदारसंघात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. आमची ताकद आहे. त्यामुळे जो पक्ष जिथे बळकट असेल त्याला तिथे लढण्याची संधी दिली पाहिजे, असे अजितदादा म्हणाले होते.

आज छगन भुजबळ यांनीही या विषयावर माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. जागावाटपाची चर्चा हा मीडियात बोलण्याचा विषय नाही. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभेच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल असे सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा