पुरंदर दि. २० ऑगस्ट २०२० :माणसाच्या जीवनामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची मोठी आवश्यकता असते.अपण मोठा दुष्काळ ही पहिला आहे. आता मुबलक असणारे पाणी उन्हाळ्यात मात्र कमी पडते. पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे आपल्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाणी हे अनमोल आहे त्याचा जपून वापर करायला हवा असे आवाहन पिंगोरीच्या सरपंच विद्या यादव यांनी केले आहे.
पिंगोरी येथील जय गणेश जलसागर आज शंभर टक्के भरल्याने पिंगोरीच्या सरपंच विद्या यादव व उपसरपंच वसंत शिंदे यांच्या हस्ते या जलाशयातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी यादव यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, माजी उपसरपंच धनंजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य ठकसेन भोसले, सेवानिवृत्त शिक्षक राजाराम शिंदे, दिलीप शिंदे, जालिंदर गायकवाड सदाशिव शिंदे,ग्रामसेवक अनिल हिरासकर इत्यादी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी लोकांमध्ये यावर्षी जलपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच विद्या यादव म्हणाल्या की, १९७२ मध्ये या तलावाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून पिंगोरीतील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा तलाव वरदान ठरला आहे. मात्र आपल्याकडून या पाण्याचा काटकसरीने वापर व्हायला हवा. लोकांनी शेतीला पाट पाणी न देता ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करायला हवा. असे केले तर आपल्या भागातील बागायत शेतीचे क्षेत्र वाढेल. पाण्याचा जपून व योग्य वापर केला तर त्याचा फायदा गावाची आर्थिक उन्नती होण्यासाठी होईल. म्हणूनच पाण्याचा वापर आपण जपून करायला हवा.
न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे