Used car scams in Pune and Pimpri-Chinchwad: पुणे ‘ऑटोमोबाइल हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतात. राज्यभरातून ग्राहक येथे जुन्या मोटारी खरेदीसाठी येतात, मात्र याच व्यवसायात फसवणुकीचा ‘टॉप गिअर’ लागला असून, वाहनांची नोंदणी न करताच होणारे व्यवहार चिंतेचा विषय ठरले आहेत. यामुळे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक व्यावसायिक जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करतात. यात ४ ते ४० लाखांपर्यंतच्या मोटारींचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. कर्ज सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना मोटार खरेदी करणे सोपे होते, पण अनेकदा बनावट कागदपत्रे किंवा तांत्रिक अडचणी असतानाही हे व्यवहार नोंदणीकृत केले जात नाहीत. कर्जाची परतफेड न झाल्याने मूळ मालकाला मोठा फटका बसतो.
परिवहन विभागाने जुन्या वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची नोंदणी करण्याबाबत अधिसूचना काढली आहे. यानुसार, वाहन डीलर्सना नोंदणी प्राधिकरणाकडून पाच वर्षांसाठी वैध असलेले अधिकृत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल. यामुळे डीलर्सना नोंदणी-फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण, डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्र, एनओसी, आणि त्यांच्या ताब्यातील वाहनांच्या मालकीचे हस्तांतरण यासाठी अर्ज करता येणार आहे.
जुन्या वाहनांची नोंदणी न झाल्याने अनेकदा ती गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरली जातात, ज्यामुळे तपास यंत्रणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ठाणे येथील एका दहशतवाद्याच्या कुटुंबीयांकडे पिंपरी-चिंचवडमधील एका राजकीय पदाधिकाऱ्याची मोटार आढळल्याची घटना याचेच एक उदाहरण आहे. पदाधिकाऱ्याने ती विकली असली तरी व्यवहार पूर्ण न झाल्याने पोलिसांना तपासात अनेक अडचणी आल्या.
फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
- वाहन खरेदी-विक्री करताना रोख रक्कम देणे टाळा.
- मूळ वाहनमालकाच्या बँक खात्यावरच रक्कम जमा करा.
- आरसी बुक, वाहनावरील कर्ज आणि इतर कागदपत्रांची खात्री करून घ्या.
पिंपरी-चिंचवड मोटर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन साकोरे यांनी दिलेल्या या टिप्स ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे










































