राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तारखेनुसार शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु तिथीनुसार विजयादशमीच्या दिवशी संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाबद्दल टोकाची टीका आणि टोकाचे कौतुक अशा संश्रिम भावना आहेत. तरीदेखील, एखादी संघटना विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन सलग शंभर वर्षे कार्यरत राहते, टीकेचे प्रहार सहन करत वाटचाल करते आणि पुढील शंभर वर्षांच्या वाटचालीची दिशा ठरवते, हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्याची दखल घेतलीच पाहिजे.
स्वातंत्र्यपूर्व काळात, १९२५ मधील विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. त्यांनी लावलेले हे रोपटे इतके विस्तारेल, अशी त्या काळात कुणी कल्पनाही केली नसेल. स्वातंत्र्यपूर्व काळात संघाने स्वातंत्र्ययुद्धाबाबत घेतलेल्या भूमिकेवर अनेकदा टीका झाली. हिंदुत्ववाद्यांबाबतच वेगवेगळे मतप्रवाह होते. आता शंभर वर्षांच्या निमित्ताने संघाने भारतीय समाज, राजकारण आणि संस्कृतीत काय योगदान दिले, तसेच पुढील शतकात त्याची भूमिका काय असेल, याचा विचार करणे आवश्यक ठरते.
टीकाकारांनी संघाला संकुचित विचारसरणीची संघटना म्हटले आहे; तर समर्थक त्याला भारतातील सर्वात मोठे स्वयंसेवक नेटवर्क मानतात. आकडेवारी आणि घटनांचा मागोवा घेतला, तर संघाची व्यापक उपस्थिती आणि प्रभाव स्पष्ट दिसून येतो. त्याची ताकद सेवेच्या परंपरेत आहे. कोरोनाच्या काळात सेवा भारती आणि स्वयंसेवकांनी ११८ कोविड केअर सेंटर आणि २८७ आयसोलेशन सेंटर चालवले. ४,१९३ प्लाझ्मा डोनेशनची सुविधा दिली. हेल्पलाइनवर ८८ हजारांहून अधिक कॉल हाताळले गेले. ९२,६५६ सेवा केंद्रांवरून ७.३ दशलक्ष रेशन किट, ४.५ दशलक्ष फूड पॅकेट्स आणि नव्वद लाख मास्क वितरित करण्यात आले. सरकार कोणत्याही विचारांचे असो—अनुकूल की विरोधी—संघाला सरकारी मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणेशिवाय लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता संघाने वारंवार सिद्ध केली आहे.
ही सेवा केवळ एका संकटापुरती मर्यादित नाही. १९४७ च्या फाळणीवेळी निर्वासित छावण्यांमध्ये मदत, १९६२ व १९७१ च्या युद्धांदरम्यान सेवा, १९८४ च्या दंगलींमध्ये शिखांना आश्रय आणि २००१ च्या गुजरात भूकंपादरम्यान पुनर्बांधणी यासारख्या उदाहरणांनी संकटकाळात संघाच्या मूक कार्याचे दर्शन घडते. म्हणूनच, टीका होत असली तरी समाजातील एका मोठ्या वर्गाकडून त्याच्याकडे विश्वासाने पाहिले जाते.
नागपूरमध्ये डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या संघटनेच्या रोपट्याने आज सहा सरसंघचालकांच्या नेतृत्वाखाली मोठा विस्तार साधला आहे. एकचालकानुवर्ती कारभारावर टीका होत असली, तरी संघाच्या शाखांची संख्या ८३ हजारांहून अधिक झाली आहे. राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे जाहीर न करताही, अनेक स्वयंसेवक पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री या पदांवर पोहोचले. सध्या संघाच्या ५२ हजार दैनिक आणि २२ हजार साप्ताहिक शाखा आहेत. विचारांचा प्रसार करण्यासाठी हिंदी, इंग्रजीसह प्रादेशिक भाषांतील दैनिके व नियतकालिके चालवली जातात. एका वर्षात शाखांची संख्या दहा हजारांनी वाढली आहे. यावरून संघाने सामाजिक पाया किती मजबूत केला आहे, हे स्पष्ट होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संकुचित हिंदुत्ववादाचा शिक्का असला, तरी गेल्या काही वर्षांत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणांतून संघ सर्वसमावेशकतेकडे वाटचाल करत असल्याचे दिसते. शताब्दीपूर्तीनिमित्त संघाने सामाजिक सुसंवाद, कौटुंबिक ज्ञान, पर्यावरण जागरूकता, स्वयंशिस्त आणि कर्तव्यभावना ही पंचसूत्री स्वीकारली आहे. ही पाच तत्त्वे केवळ घोषवाक्ये ठरतील, की त्यांचे व्यापक सामाजिक प्रवचनात रूपांतर होईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
सामाजिक सुसंवादासाठी अनुसूचित जाती-जमाती व वंचितांसाठी मंदिर प्रवेश मोहीम, उपेक्षित गटांमधील पुजाऱ्यांचे प्रशिक्षण आणि एकल विद्यालयांद्वारे अनुसूचित जमातीच्या मुलांचे शिक्षण हे उपक्रम राबवले गेले आहेत. जातीभेदावरील संघाची भूमिका अशी आहे की प्राचीन काळात जाती जन्मावर नव्हे, तर गुणांवर आणि कृतींवर आधारित होती. भगवद्गीतेमध्ये समाजाचे विभाजन कर्म आणि निसर्गानुसार असल्याचे म्हटले आहे. मग जातीभेद टिकून का राहिला? संघाचा युक्तिवाद असा आहे की ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने जनगणना व ‘मार्शल रेस’च्या संकल्पनांद्वारे समाजात विभागणी पक्की केली. इतिहासकार याला सरलीकरण म्हणतात; परंतु वसाहतवादी धोरणांमुळे जातींची ओळख मजबूत झाली हे नाकारता येत नाही.
स्वातंत्र्यलढ्यात संघाने काय केले, हा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. गांधीजींच्या हत्येनंतर घातलेली बंदी याला कारणीभूत आहे. तरीदेखील, १९३० च्या पूर्ण स्वराज घोषणेला संघाने पाठिंबा दिला होता, १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान विदर्भातील चिमूर-आष्टी उठावात स्वयंसेवक हुतात्मा झाले, तसेच अरुणा आसफ अली यांसारख्या नेत्यांना आश्रय देण्यात आला होता. संघाने राजकीय लढाईऐवजी सामाजिक-सांस्कृतिक पाया मजबूत करण्यावर भर दिला. ही रणनीती योग्य की अयोग्य यावर इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात संघाने राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले. विद्या भारती, सेवा भारती, वनवासी कल्याण आश्रम आणि सरस्वती शिशु मंदिर यांसारख्या संस्थांनी शिक्षण व सेवाक्षेत्रात मोठे नेटवर्क उभारले. आपत्तीकाळात तत्पर मदतीमुळे संघाला स्थानिक मान्यता मिळाली. दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद आणि दत्तोपंत ठेंगडी यांचे पर्यायी आर्थिक विचार हे संघाशी निगडित महत्त्वाचे वैचारिक योगदान आहे.
संघावर तीन वेळा बंदी घालण्यात आली—१९४८ मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर, १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात आणि १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर. मात्र प्रत्येक वेळी तो अधिक बळकट झाला. टीकाकार हे राजकीय पाठबळ मानतात; तर समर्थक अंतर्गत संघटनात्मक ताकदीला श्रेय देतात.
आता प्रश्न असा आहे की, पुढील शतक संघासाठी कसे असेल? तो केवळ सामाजिक संघटना राहील, की भारताच्या जागतिक अजेंड्यावरदेखील प्रभाव टाकेल? संघाचे म्हणणे आहे की भविष्यातील आव्हाने सीमेपलीकडची असतील. ती वर्गखोल्यांत, प्रयोगशाळांमध्ये, माध्यमांमध्ये आणि डेटा सेंटरमध्ये उभी राहतील. तरुणांनी कौशल्य आणि सेवा द्यावी, व्यावसायिकांनी सामाजिक समस्यांवर आपली प्रतिभा वापरावी, पालकांनी मुलांना गीता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता दोन्ही शिकवावी, तसेच वडीलधाऱ्यांनी अनुभवांच्या आधारे नवीन पिढीला दिशा द्यावी, अशी संघाची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले शतक हे सिद्ध करते की सेवा आणि सुसंवादाद्वारे समाजाला एकत्र आणण्यासाठी ही संघटना अथक प्रयत्नशील आहे. टीका आणि वाद कायम राहतील; पण लाखो स्वयंसेवकांचे निःस्वार्थ योगदान भारताच्या सामाजिक रचनेवर परिणामकारक ठरत आहे. मागचे शतक लवचिकतेचे होते, तर पुढचे पुनरुत्थानाचे असेल. मागचे शतक जागृतीचे असेल, तर पुढचे कृतीचे असेल. मागचे शतक जगण्याचे होते, तर पुढचे नेतृत्वाचे असेल. संघाची ही विचारधारा किती पुढे जाईल, हे येणारे शतक ठरवेल.
भागा वरखडे













































