गाझियाबाद, १५ डिसेंबर २०२२ :गाझियाबादमधील मसुरीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीसह दोन जणांचा ट्रेनच्या धडकेत मृत्यु झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास मसुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कल्लू गढी रेल्वे गेटजवळ एक तरुणी आणि दोन तरुण ट्रॅकवर उभे राहून रील बनवत होते. तिघेही रील बनवण्यात इतके मग्न झाले होते की रेल्वे रुळावर ट्रेन आल्याचेही त्यांना जाणवले नाही.
अखेर काही कळण्याच्या आत भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेनने या तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही मृत्यु झाला. दरम्यान, या घटनेचीमाहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्या तरुणीची तसेच तिच्या इतर दोन मित्रांची ओळख पटलेली नाही. तरुणीचे वय साधारण: २२ ते २५ आणि दोन्ही तरुणांचे वय ३० ते ३५ वर्ष इतके असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या भयंकर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून रील बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.