वडगावच्या विकास आराखड्यात ३० कोटींचा घोटाळा? मनसेने दिला जनआंदोलनाचा इशारा!

Vadgaon Maval Development Plan Scam MNS Warns of Public Protest
मनसेने दिला जनआंदोलनाचा इशारा;

Vadgaon Maval Development Plan Scam MNS Warns of Public Protest: वडगाव नगरपंचायतीने नुकताच प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी या आराखड्यावर गंभीर आरोप करत सुमारे ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हा आराखडा पूर्णपणे मनमानी पद्धतीने, बिल्डरधार्जिणा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी तयार करण्यात आला असून, तो स्थानिक अल्पभूधारक शेतकरी आणि वडगावातील सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारा आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना म्हाळसकर यांनी मोनार्च एजन्सीने तयार केलेला अस्तित्वातील जमीन वापर नकाशा चुकीचा असल्याचे म्हटले. सॅटेलाईट डेटा आणि प्रत्यक्ष स्थळपाहणीतील अनेक त्रुटी पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. केतकर समितीपुढे नागरिकांनी ६५० हरकती आणि सूचना दाखल केल्या होत्या, तरीही १६ जून २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या सुधारित प्रारूप आराखड्यात केवळ ४३ आरक्षणांमध्येच बदल करण्यात आले, यावर म्हाळसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आराखड्यात जैन स्थानकावर आरक्षण टाकून त्या ठिकाणाचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही म्हाळसकर यांनी केला. तसेच, गणेश मंदिर ते शिवाजी चौक, रेल्वे हद्द ३० मीटर, दत्त मंदिर ते चिंचेचा गणपती या मार्गावरील रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. वडगाव नगरपंचायत ते पंचायत समिती चौक या मुख्य रस्त्याची रुंदी १२ मीटर करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या मनमानी आराखड्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल आणि कायदेशीर लढा दिला जाईल, असा इशारा म्हाळसकर यांनी दिला आहे. विकास आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. त्यामुळे सद्यःस्थितीत प्रसिद्ध झालेला हा आराखडा रद्द करून नव्याने सर्वेक्षण करून नवीन प्रारूप विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा, ग्रामस्थांच्या वतीने नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे