आगामी वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून, स्थानिक पातळीवर स्वबळाचे नारे ऐकू येत आहेत. महायुती होणार की नाही, याबद्दल अद्याप स्पष्टता नसतानाही, वडगावच्या भाजप नेत्यांनी स्वबळावर ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार केला आहे.
त्यामुळे महायुती न झाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
शहर भाजपने सावध पवित्रा घेत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून, नुकत्याच झालेल्या ‘निर्धार मेळाव्यात’ पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्याच्या हेतूने पक्षाने १७ जणांची कोअर कमिटी स्थापन केली असून, ही समिती निष्ठावंत उमेदवाराच्या शोधात आहे.
सध्या नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण महिलेसाठी’ राखीव असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.
दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सक्षम उमेदवारालाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाईल. राष्ट्रवादीनेही इच्छुकांसाठी अर्ज मागवले आहेत.
मागील २०१८ च्या निवडणुकीत भाजपमध्ये झालेल्या गोंधळामुळे पक्षाचा पराभव झाला होता, तर अपक्ष उमेदवार मयूर ढोरे विजयी झाले होते आणि नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे यंदा ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित आहे. दोन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि देवदर्शने घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































