महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि मनसेतून बडतर्फ केलेले वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दोन वेळा रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सामंत यांनी सांगितले की, एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश तीन वेळा रद्द होणे म्हणजे खच्चीकरणासारखे आहे आणि अशा पद्धतीने हे होऊ नये.
उदय सामंत म्हणाले की, वैभव खेडेकर हे समाजात तळागाळापर्यंत काम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि ते माझे जवळचे मित्र आहेत. तरीही त्यांचा पक्षप्रवेश तीन वेळा का रद्द झाला, हे मला कळलेले नाही. त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्या पक्षात जावे हे वैयक्तिक निर्णय आहे, पण कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश तीन वेळा रद्द होणे नको, हे निश्चित आहे.
पत्रकारांनी विचारले की, वैभव खेडेकर शिवसेनेत आले तर पक्षप्रवेश घ्याल का? यावर सामंत म्हणाले की, सध्या खेडेकर भाजपात आहेत आणि त्यांनी त्यांच्याजवळ बोला, ते येतात का ते पाहा. जर ते येणार असतील, तर मी भेट घेऊन निर्णय घेईन. पक्षप्रवेश तीन वेळा रद्द होणार नाही याची हमी देखील मी देतो, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
चिपळूण येथील उद्योगपती व राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले प्रशांत यादव सुटल्याबाबत पत्रकारांनी विचारले, तेव्हा सामंत म्हणाले की, शेवटी कोणाला घेणे आणि कोणाला सोडणे हे राजकीय ज्ञान माझ्याकडे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद नीट पाहिली तर प्रत्येक तालुक्यात शिवसेनेचं प्राबल्य आहे. कोणालाही कमी लेखणार नाही, आणि भाजप तसेच राष्ट्रवादीसोबत युती करून पुढे जायचे हीच आमची भूमिका आहे, असे सामंत यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































